Thursday, 13 September 2018

आठवणींच्या पानातील गणेश उत्सव


सार्वजनिक गणपती उत्सवाच माझं नातं जडलं ते लातूर पासून मी कदाचित तिसऱ्या किंवा चौथ्या इयत्ते असेल. लातूर येथील राघवेंद्र कॉलोनी येथे त्यावेळी मी राहत होतो. मूळ लातूर शहरा पासून थोडे दूर असलेले हे ठिकाण होते त्यावेळी, ग्रामीण परिसर आणि वीटभट्ट्या असल्यामुळे त्याला खाडगावच्या वीटभट्टी परिसर म्हटले जायचे. आमच्या कॉलनी लगटच वीटभट्टी कामगारांची सुद्धा वस्ती होती. माझा घरा समोर एक लाकडाचा अड्डा होता एका मुस्लिम कुटुंबाचा, ‘शेख चाचा’ असे नाव होते त्या व्यक्तीचे, त्यांचा लाकडाचा अड्डा आणि एक किराणा दुकान होते.  दिवस भर काबाड कष्ट करून जगणाऱ्यांची ती वसाहत होती. माझ्या सारखे काही मध्यमवर्गीय कुटुंब सुद्धा होते तिथे. घरात लहानपण पासून गणपती बसवताना बघितले होते, गणपतीची आरास, त्याचे स्वागत, गणपतीची आरती आणि प्रसादाचे मोदक यांचे आकर्षण तर होतेच पण त्याच बरोबर सार्वजनिक गणपती उत्सवाचे सुद्धा खूप आकर्षण होते, उस्मानाबादला माझ्या काकांच्या पुढाकाराने सुरु झालेला सार्वजनिक गणेश उत्सव पहायला मिळत होता, त्यात असलेली मज्जा अनुभवायला मिळत होती. १९८५-८६ पासून आमच्या गल्लीत उस्मानाबादला गणेश उत्सव सुरु झाला जे आज सुद्धा तेवढ्याच उत्साहात चालू आहे
त्यातून प्रेरणा घेऊन म्हणा आम्ही सर्व मित्रांनी लातूरला आम्ही राहतं असलेल्या कॉलनीत सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करायचे ठरवले. त्याची खरी प्रेरणा तर आई कडूनच मिळाली होती मला पण ज्यावेळी वडिलांनी साथ द्यायची ठरवली सांगितले जेवढी आम्ही सर्व मित्र मिळून वर्गणी जमा करू तेवढीच वर्गणी ते टाकणार होते तेव्हा दहा हत्तीचे बळ आले अंगात. मग काय लागलो कामाला !!!, सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन करायचे ठरले. त्याला नाव सुद्धा आम्हीच सर्व मित्रांनी मिळून ठरवले "बाल गणेश मंडळ राघवेंद्र कॉलनी लातूर" या नाव खाली सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करायचा ठरले. कॉलनीत राहणाऱ्या आठ-दहा घरातील लहान लहान मुले मिळून आम्ही सर्वांच्या घरो-घरी वर्गणी गोळा करायला जायला लागलो. शेख चाचानी सुद्धा वर्गणी दिली आणि त्यांची मुले "मंजूर आणि बशीर" यांना आमच्या सोबत पाठवले. अशी सगळ्या जाती-धर्मातील मित्रांची फौज घेऊन आम्ही सार्वजनिक उत्सवाची तयारी सुरु केली. सात-आठ दिवसांच्या प्रयत्ना नंतर आमचे दीडशे ते दोनशे रुपये जमले होते. पावती पुस्तक नसल्यामुळे आईने एक कोऱ्या कागदा वर वर्गणीदाराचे नाव रक्कम आणि सही असे रकाने आम्हला करून दिले होते त्यामध्ये आम्ही त्यांची माहिती भरून घ्यायचो. सार्वजनिक पैशांचा दुरुपयोग होऊ नये त्याचा योग्य खर्च व्हावा या करीता माझ्या आईने त्याची कागदावर योग्य मांडणी करून दिली होती. सार्वजनिक आयुष्यात पैशांचा योग्य ताळेबंद असणे खूप जरुरीचे असते हे त्यावेळी शिकलो
(फोटो काल्पनिक आहे)
त्यात माझ्या वडिलांनी तेवढेच मिळून एकूण ३०० ते ३५० रुपये जमा झाले. आजच्या कळत त्याचे फार मूल्य नसेल पण त्यावेळी खूप मूल्य होते त्याला, त्यामुळे उत्साहाने ५१ किमतीचा एक गणपती सुद्धा आम्ही पसंत करून आलोत. त्यानंतर सार्वजनिक गणपती कारता लागणाऱ्या सर्व गोष्टीची यादी आम्ही सर्व मित्रांनी बनवली आनि त्याचा अंदाजे खर्च हि काढला. हे सगळं होत असताना एक समस्या आमच्या समोर उभी राहिली ती म्हणजे गणपती बसवण्याची जागा, आम्हाला सुचत नव्हते कोणत्या सुरक्षित जागेत गणपती बसवावा. खूप विचार केल्यानंतर माझ्या घराच्या अंगणात लोखंडी पत्रे आणि ताडपत्री चा वापर करून एक पेंडॉल उभा करायचा असे ठरले, शेख चाचा ने त्यांचे पत्रे आम्हला देऊ केले होतेच. थोडे धोकादायक होते पण सर्वानुमते आम्ही हा निर्णय घेतला
त्या नंतर गणपतीच्या १० दिवसाचे व्यवस्थपन करायला आम्ही शिकलो, छोट्या छोट्या गोष्टीचे व्यवस्थपन जसे की रोजच्या सकाळ-संध्याकाळच्या पूजे करीत लागनाऱ्या गोष्टी फुले, हार, दीप-बत्ती, प्रसादाचे चुरमुरे या गोष्टी असतील किंवा सकाळ-संध्याकाळी होणाऱ्या आरतीची जवाबदारी कॉलनी ती प्रत्येक कुटुंबा वर टाकली त्यामुळे ते कुटुंब मंडळाशी जोडले जाईल अशी व्यवस्था आम्ही केली. यात त्या मुस्लिम कुटुंबाचा सुद्धा सहभाग राहील हे पहिले.  पण उशिराने जग आलेल्या आमच्याच कॉलनीतल्या मोठ्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे गणपती बसवण्याची जागा बदलली आनि आम्ही त्यावर्षी त्या ठिकाणी गणपती बसवू शकलो नाहीत,त्यामुळे आम्ही सर्व मित्र खचून जात पुन्हा नव्या जोमाने नवीन ठिकाणी गणपतीचे स्वागत केले. गणपती त्या वर्षी राघवेंद्र स्वामी मंदिरात बसवला गेला. त्यावर्षी पासून आमच्या कॉलोनीत नियमित सार्वजनिक गणेश उत्सव झाला त्या मंडळाचे नाव ठेवले गेले, “बाल गणेश मंडळ राघवेंद्र कॉलनी लातूर". आमच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची ती खूप मोठी पावती होती. त्याच्या पुढल्या वर्षी माझ्या वडिलांची बदली लातूर वरून उस्मानाबादला झाली, आम्ही उस्मानाबादला राहायला आलो. तेथे सुद्धा सार्वजनिक गणेश उत्सवाचे वेड मनात होतेच माझ्या काकांचं प्रयत्नातून तो तेथे चालूच होता त्याच मंडळात मी ही सामील झालो, हिरीरीने भाग घ्यायाला लागलो. मंडळाचा सामान्य कार्यकर्ता ते अध्यक्ष या प्रवासात नेतृत्व गुण विकसित करण्याची संधी मला मिळाली. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना सर्वाना सोबत घेऊन आणि एक संच (टीम) म्हणून काम करायला गणेश उत्सवाच्या माध्यमातून शिकलो. श्री गणेश जसे बुद्धी, ज्ञान-विज्ञानाची देवता आहे तसेच तो नेतृत्व निर्मितीचा स्त्रेत आहे. आशा या गणरायाला वंदन करून म्हणूया
गणपती बाप्पा मोरया !!!
मंगल मूर्ती मोरया !!!