Monday, 13 May 2019

#PuneJunction


पुण्यात येऊन जवळ-जवळ १० वर्ष झाली, २००८ साली या शहरात येताना शहरा बद्दल एक वेगळं आकर्षण होत. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही राहणारे असोत पण पुणे तुम्हाला खुणावतच असते, कधी विद्यार्थ्याना, नोकरदारांना (सरकारी खाजगी क्षेत्रातले) आणि हे दोन्ही आले म्हणून व्यावसायिकांना हे शहर आकर्षित करतच असते.
बीड ला शिकायला असताना पुण्या सारख्या महानगारांचे क्षितीजे खुणावत होती, वयाच्या वीशीत काही मिळवायचे, करून दाखवायचे स्वप्न पाहतांना या अलिबाबा च्या गुहा दिसातातस्वर्गवत दिसणाऱ्या या शहरात येणाऱ्यांची पावले दिसतात पण परत फिरणारी पावले नसतात हे त्यावेळी माहित नव्हते. पुण्यात आलो त्यावेळी या शहराची खूप भीती वाटायची इथल्या भाषेची, वागायची, इथल्या माणसांची, रस्त्यांची, इथल्या वास्तुं ची, नकळत चूक व्हावी आणि स्वप्नभंगाचे दुःख पदरी पडावे म्हणून भीती वाटत असे

पुण्याचे मुंबई सारखे नसते "रात गयी बात गयी", पुणे एखाद्या खुंशी माणसं प्रमाणे सगळं लक्षात ठेवते वेळ आल्यावर हिशोब चुकता करते, अस्सल पुणेकरांना राग आला असेल तर माफी असावी पण इलाज नाही. असो पण आता हे शहर रुळलेल्या प्रेयसी सारखे झाले आहे ती आपली असते आणि तिचे नखरे सुद्धा ओळखीचे झालेले असतात, नाविन्य असे वाटत नाही. हे शहर सुद्धा आता जुने झाले आहे, याचे नखरे ओळखीचे झाले आहेत. हे शहर सवयीचे झाले आहे म्हणून असेल याची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते, आपली वाटते. स्थान महात्म असे काही नसते, भावनांची गुंता-गुंत झाली की स्थान महात्म होते असेच या शहरा बद्दल होऊन जाते. काही लोक एकत्र येऊन वसाहत करतात त्यावेळी शहरे निर्माण होतात आणि हेच शहर त्या माणसांची ओळख बनतात.

विराज