Friday, 15 November 2019

वृंदावन


प्रिय आज्जी,

स.न.वि.वि.

तू असताना कधी पत्र लिहण्याचा योग आला नाही, किंवा गरज हि पडली नाही. कारण त्यावेळी अनेक साधने होती ज्यामुळे तुझ्याशी संवाद साधता यायचा, मोबाईल, फोन द्वारे तुला बोलता यायचे, आणि तू इतकी कधी दूर नसायाचीच की आवाज पोहंचनार नाही पण आता तस नाही. कदाचित पत्र हे एकमेव साधन असू शकेल तुझ्याशी संवाद साधायचे, म्हणून हा पत्रपंच...
उस्मानाबादच्या घरातल्या अनेक आठवणी आता आठवत आहेत, अनेक घटना डोळ्यासमोरून जात आहे, अनेक शब्द कानात घुमत आहेत, जणू काही आताच घडून गेल्या सारख्या, भूतकाळात जायची कोणती मशीन असती तर वारंवार त्या घटना, ते क्षण पुन्हा एकदा जगलो असतो. पण एक आवाज कायमस्वरूपी कानात घुमत राहतो ते म्हणजे तू गायलेली अंगाई, "लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई" हे गाणं आज सुद्धा तुझ्या आवाजात कानामध्ये घुमत आहे. एक वेगळी मोहिनी त्या गाण्यात आणि "अमृता" ची गोडी तुझ्या आवाजात होती. तुझ्या आवाजात घोगरेपणा होता पण त्याला माधुर्य होते, तूच बोलायचीस तुझ्या लहानपणी कोणी तरी तुला शेंदूर खाऊ घातल्यामुळे तुझा आवाज खराब झाला. पण तरी सुद्धा त्या आवाजात मधुरता आणि खंबीरता दोन्हीही असायच्या, उच्चारांची स्पष्टता, वाक्यातले चढ-उत्तर कसलेल्या वक्त्या प्रमाणे होते. रघुनाथाचे भजन गाताना तुला अनेकदा ऐकले आहे, आता प्रत्यक्ष रघुनाथाला तू भजन ऐकवत असशील यात मला तिळभर शंका नाही.
तुझ्या लहानपणीच्या अनेक गोष्टी, गंमती-जमती तू आम्हला सांगितल्या आहेत. तुझ्या माहेरी असलेले "कुलकर्णीपण", त्याचा तुला खूप अभिमान होता. भूम तालुक्यातल्या चिंचपूर गावातले तुम्ही काळे-जोशी. घरात जसे कुलकर्णी पण होते तसेच भिक्षुकी सुद्धा पिढीजात चालून आलेली होती. "कमल" हे तुझा माहेरीच नाव, यशवंत-पार्वती यांची तू मोठी मुलगी होतीस. तु वडिलांना दादा आणि चुलत्यांना अप्पा म्हणायचीस, देवडीकरांचा एकूण रागरंग पाहता कला आणि त्यातल्या त्यात नाट्य व संगीत कालेची आवड तुझ्या माहेरकडून आली असावी असे वाटते. तू सांगायचीस तुझ्या वडिलांची नाट्य कंपनी होती म्हणून तुला लहानपणी वेगवेगळे नाटक बघण्याची संधी मिळायची. नाटकात अभिनय केलेला मात्र तू कधी सांगितलं नाहीस पण तुझे साभिनय भारूडाचे सादरीकरण उत्तम असायचे. आत्ता आता वयाच्या ८५व्या वर्षा पर्यंत तुझे साभिनय भारूड सादर केली होतीस. आमच्या प्रत्येकात कलेचा गुण तुझीच देणगी आहे असे म्हणावे लागेल.
नाटक, संगीत आणि त्याच बरोबर तुझी अजून एक आवड म्हणजे "आध्यात्म", स्वतःची वैचारिक बैठक निर्माण करून त्यावर आधारित डोळस आध्यात्म तुझे होते. कोणत्याही ऐकीव गोष्टीवरती अंध विश्वास न ठेवता आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक पातळीवर त्याचे मूल्यमापन तू करायचीस. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रंथराज  दासबोध, श्रीमत भागवत हे फक्त परायणाचे ग्रंथ नसून जीवनाचे मार्गदर्शक आहेत असे तू मानायची. उस्मानाबादच्या घरत तुझ्या आजोबांनी दिलेला ग्रंथराज दासबोध वाचताना तू अजून सुद्धा डोळ्या समोर दिसतेस. आज काल दिसणारी दांभिक आध्यात्माची कीड तुझ्या आध्यात्मिक आयुष्यात नव्हती. आजोबां सोबत आध्यात्मिक विषयावर शास्त्रार्थ करताना अनेकदा अनुभवले आहे. अखंड नामस्मरण हे तुझ्या आध्यत्मचे तत्व शेवट पर्यंत राहिले. जपाची माळ शेवट पर्यंत तुझ्या सोबत दवाखान्यात होती आणि हाताची नामस्मरण मुद्रा होती.
तू सोवळे, शीवा-शीव म्हणायचीस कारण जातीयतेच्या बडगा असलेल्या समाजात आणि काळात तुझा जन्म झाला म्हणून असेल पण काळानुसार बदल स्वीकारणे तुला मान्य होते. त्यामुळेच असेल घरातील अंतजातीय विवाहांना तू फक्त स्वीकारलं असे नाही तर त्यांना आपलस सुद्धा केलं. हे शक्य झालं ते तुझ्या स्वतःच्या आध्यात्मिक बैठकी मुळेच. लोकसंचय हा अजून एक तुझा गुणधर्म, वेगवेळ्या जाती पंथाच्या लोकांसोबत घेऊन कार्य करण्याची तुझी वृत्ती होती. आनंद नगर येथे श्रीकृष्ण मंदिर असावे हि तुझीच संकल्पना कारण कोणत्याही जाती-पंथाचा व्यक्ती श्रीकृष्णाची पूजा बांधू शकतो व त्याद्वारे सर्व जाती पंथाचे व्यक्ती त्या मंदिराशी जोडले जाऊ शकतात हा त्यामागचा उद्देश. हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह, वेगवेगळ्या मंदिरातील वेगवेगळे कार्यक्रम या मुळे तूम्ही दोघे ही लोकांच्या संर्पकात होते, समता नगर मधील दत्त मंदिर, समर्थ नगर मधील श्रीराम मंदिर, अनंतदास स्मारक मंदिर येथे तुमचे कार्य विशेष होते. राष्ट्रभावनेने प्रेरित असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक प्रचारक, कार्यकर्ते वार लावून आपल्या कडे जेवायला असायचे त्यांना स्वहस्ते जेवायला तू वाढायचीस. तुझ्यात असलेल्या राष्ट्रीय विचारा मुळेच हे शक्य झाले. आता संघ काम करताना पुण्यात अनेक प्रचारक व राष्ट्रीय कार्यकर्ते ना "देवडीकर आज्जी" अशी ओळख सांगणे पुरेशे असते ते त्यामुळेच. १८-१९ वर्षाखाली तुझ्या आणि आजोबांच्या हातून भूमी पूजन झालेल्या कुंपनलिका अनेक दुष्काळ उस्मानाबादकरांची तहान भागवत आहे.
शिक्षणाचे महत्व तू ओळखले होते, लौकिक अर्थाने जरी पाचवी-सहावी पर्यंत तुझे शिक्षण असले तरी समज व ज्ञान कोणत्यातरी पदवीधरा पेक्षा जास्त होते. एखादी गोष्ट 'मला येत नाही' असे सांगण्या पेक्षा ती गोष्ट 'मला शिकायला आवडेल' असा तुझा दृष्टिकोन असायचा. एखाद्या गोष्टी बद्दल अभ्यास करणे, त्याविषयी चर्चा करणे आणि त्याबद्दल स्वतःचे एक मत तयार करणे असा तुझा दृष्टिकोन होता. मुलांचं शिक्षण हे सुद्धा तेवढेच महत्वाचे मानून त्याकडे सुद्धा लक्ष दिले, त्यावेळच्या समाज व्यवस्थे मध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात तुझ्याच मुळे तिन्ही मुले कार्यरत झाली व यशस्वी झाली. आयुष्यभर नवीन शिकण्याचा ध्यास तुला होताच अगदी सांगायचे झाले तर वयाच्या ८३-८४ व्या वर्षी सुद्धा मोबाईल तू शिकला होता. नवीन तंत्रज्ञानाची सुद्धा तुला आवड होती. धार्मिक वृत्ती असून सुद्धा कधी अघोरी कर्मकांडाच्या आहारी तू गेली नाहीस तसेच विज्ञानाशी कधी वावडे  नाही.
उस्मानाबादच्या घराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या घरा भोवती तू उभा केलेली वृक्ष संपदा. आंबा, पेरू, बोर, जांभूळ, सीताफळ, पपई, रामफळ, डाळींब, शेवगा ही फळ झाडे. जाई-जुई, गुलाब, चमेली, सदाफुली, पारिजातक हे फुल झाडे तर अशोक, निलगिरी, औदुंबर हे वृक्ष अजून सुद्धा तुझी साक्ष देत आहेत.  दारात पडलेल्या  पारिजातकांच्या फुलाचा सडा आणि रातराणीच्या फुलांचा सुगंध अजूनही तिथल्या हवेत दरवळत आहे.वृक्ष वल्ली आम्हा सोयरेया तुकोबांच्या ओळी प्रमाणे तू घरातले नंदनवन फुलवले. माणसं इतकं झाडांना सुद्धा जपलं.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या काही वर्षातच तुझं लग्न झाला होत, साल नेमकं माहित नाही १९४८-४९ असेल, सहजीवनाची ७१री साजरी करत आहेत तुम्ही, सर्वसामान्य माणसाची आयुर्माना एवढे तुमचे सहजीवन आहे हे सुद्धा आजच्या काळातील "अपूर्वा"ई म्हणावी लागेल. पण आता ते खूप एकटे आहेत, तसे ते दाखवत नाहीत पण जीर्ण व प्राचीन वृक्षा प्रमाणे शांत आणि गंभीर आहेत. तुझ्या नसण्याचा फरक त्यांच्यात दिसत आहे पण ते समाधानी आहेत.
गदिमांच्या काव्य पंक्ती प्रमाणे,
"ज्ञनियाचा वा तुकियाचा
तो च माझा वंश आहे,
माझ्या रक्तात थोडा
ईश्र्वराचा (देवा-)अंश आहे"

 उत्कर्षा ची आनंदयात्री तू आज "राघवा"च्या चरणाची दुर्वांकुर आहेस...!!!


वृंदावन



Wednesday, 19 June 2019

Game of Thrones...!!!


"वराती मागणं घोड" हा वाक्य प्रचार आम्हाला चफलाक लागू पडतो, सगळं जग ज्यावेळी एखाद्या दिशेला धावत असतं त्यावेळी आम्ही कुठेतरी मागून चाचपडत उठून चालायला लागतोत. असा काहीसा हा प्रकार, मग स्वतःची समजूत काढण्याकरिता आणि झालेली चूक झाकण्याकरिता, "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" असे म्हणून समाधान मानतो. हे सांगायचं कारण असं झालं की, "गेम ऑफ थ्रोन्स", २०११ सालची वेब सीरिज समजायला आम्हला फेब्रुवरी २०१९ उजडावा लागला प्रत्यक्ष ते पाहण्यास सुरवात केली मे २०१९ पासून, कस बस एका मित्रा कडून ढापून आम्ही गेम ऑफ थ्रोन्स पहायला सुरवात केली. दररोज चुकता एक-दोन तर कधी रविवारी सुट्टीच्या दिवशी तीन-चार एपिसोड पहायचा निर्धार केला, सध्या हा नित्यक्रम झाला आहे. जणू "पारायणं" चालू आहे (पारायणं ही बायकोची उत्क्रांती) कारण मी सध्या दररोज ऑफिस वरून आलो की पुढचा एपिसोड सुरु करून पाहत असतो त्यात माझा संध्याकाळचा वेळ जातो म्हणून पारायणं.

सुरवातीस मूळ कादंबरी वाचून वेब सीरिज पाहण्याचा माझा विचार होता, पण आजूबाजूला असलेल्या स्पॉईलर मुळे तो विचार मी बदलला आणि सरळ टेलिव्हिजन सीरिज च पारायणं सुरु केलं. ह्या मितितुन त्या मितीत भ्रमण केल्याचा अनुभव या टेलिव्हिजन सीरिज मुळे आपल्याला घेता येतो. आपल्या आजूबाजूला एखादा लॉर्ड किंवा राजा बसून वाईन चे चषकावर चषक संपवत असतो, कोठून तरी सैन्याच्या हालचालींचा आवाज येत असतो, लावण्यखणी राणी समोरून जात असते, तर कधी तलवारींचा खणखणाट व युद्धाच्या ललकारी कानात गुंजत असतात. "Game of Thrones" म्हणजे "सिहांसनाचा खेळ" किंवा "सत्तेचा खेळ" ह्या  टेलिव्हिजन सीरिज चा HBO  वाहिनीवर पहिला एपिसोड १७ एप्रिल २०११ रोजी टेलिकास्ट झाला तर शेवटचा १९ मे २०१९. साधारण ८ वर्ष चालू असलेली टेलिव्हिजन सीरिज George RR Martin यांच्या फॅन्टसी कादंबरी A Song of Ice & Fire वर आधारित आहे. हा सुद्धा सात पुस्तकांचा संच आहे व जो १९९६ ते २०११ या काळात प्रकाशित झाला. 

हा सिहांसनाचा खेळ मुख्यतः मानवाच्या तीन गरजांची संबंधित आहे. १) सत्ता (power) २) संपत्ती (Money) ३) सेक्स, ह्या तीन गरजा धरूनच पूर्वी पासून मानवच समाजकारण घडत आले आहे. त्याचे यथायोग्य चित्रण या सीरिज मध्ये दिसते. युरोप व पाश्चिमात्य देशातील मध्य युगीन कालखंडचे चित्रण या मालिकेत आपल्याला पहायला मिळते. एक प्रगत संस्कृती ज्यात व्यापार, कला, साहित्य, विज्ञान याचे दर्शन तर घडतेच पण त्याच बरोबर मानवाची सत्ता पिपासूं वृत्ती इतरांच्या जीवाची व इतर कशाची ही पर्वा न करता कोणत्याही थराला जाऊ शकते ह्याचे सुद्धा दर्शन होते. कालखंड मध्ययुगीन व युरोपातील असल्यामुळे सहाजिकच रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, नियम त्या काळातील आहेत. जन्म, मृत्यू आणि त्यांचे संस्कार सुद्धा त्या काळा प्रमाणेच दिसतात. या मालिकेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब व्यवस्था आणि लग्न संस्कार त्या वेळच्या समाजाचे सुद्धा महत्वपूर्ण अंग यात दाखवले आहे. भौगोलिक दृष्ट्या युरोप सोबत रशिया व चीन संस्कृती सुद्धा आपल्याला दिसून येते. उत्तर आफ्रिकेतील किंवा पश्चिम आशियातील देश असे सुद्धा चित्रण यात पहायला मिळते. पण स्थळ व ठिकाणांची नावे मात्र काल्पनिक आहेत. अर्थात ते मी येथे सांगणार नाही. मुळात लेखकाने हे काल्पनिक चित्र अत्यंत योग्य पणे आणि मापक रंगवले आहे. कोठेही अवास्तव व अति काल्पनिक मांडणी या सीरीज मध्ये नाही. दिगदर्शकाने सुद्धा cinematic liberty च्या नावाने मूळ कथेस कसलीही छेड छाड़ केलेली जाणवत नाही. 

वेग-वेगळी राज घराणे आणि त्यांचा सिहांसनावरील हक्क त्याकरिता चालणारे राजकारण या प्रमुख सुत्रा भोवती जरी हे कथानक विणलेले आसले तरी मानवाच्या विविध पैलूंचे दर्शन या माध्यमातून होते. मालिकेतील राज्य व्यवस्था ज्याप्रमाणे युरोपचा प्रभाव जाणवतो त्याच प्रमाणे समाज व्यवस्थे वर ख्रिस्त धर्माचा प्रभाव जाणवतो. शारिरीक संबंधाच्या बाबतीत लेखकाने चांगलाच मोकळा हात सोडलेला दिसतो. शारिरीक संबंध हे नाते संबंधा पेक्षा महत्वाचे दाखवले गेले आहे. समलिगी संबंधनाची सुद्धा मांडणी या कथेत दिसून येते. मात्र कोणतेही शारिरीक संबंध मूळ कथेला धरूनच आहेत असे दिसते. कसल्याही प्रकारची अवास्तव अश्लील मांडणी कथेत नाही. “Night is full of dark, किंवा  Winter is coming”  आशा असंख्य संवाद कथानकाची उत्कंटा वाढवायला मदत करता. सर्व पात्रांनी योग्य अभिनय केला आहे

या सीरिज ची तुलना काही माध्यमातून महाभारताशी केलेली मला दिसली. काहींचे म्हणणे असे जाणवते की हे कथानक तेथील महाभारत आहे. मी या मताचा नाही मला हे कथानक इकडचे-तिकडचे महाभारत वाटत नाही. मुळात महाभारताचा एकांगी विचार करणाऱ्यांना असे वाटू शकते. "युद्ध" हा एकच निकष लावून लिहलेले हे कथानक कसे काय महाभारताशी तुलनात्मक असू शकते??? लेखकाने दिग्दर्शकाने कथेचे स्वातंत्र्य जपलेले दिसते, मात्र आपण याची तुलना जगातील कोणत्याही महा काव्याशी करणे मूर्ख पणाचे ठरेल.

सत्ताकारनाची आवड असणार्यांनी जरूर ही सीरिज पहावी कारण यातील प्रत्येक घटना त्याशिवाय पचनी पडणार नाही.

विराज