प्रिय आज्जी,
स.न.वि.वि.
तू असताना कधी पत्र लिहण्याचा योग आला नाही, किंवा गरज हि पडली नाही. कारण त्यावेळी अनेक
साधने होती ज्यामुळे तुझ्याशी संवाद साधता यायचा, मोबाईल, फोन द्वारे तुला बोलता यायचे, आणि तू इतकी कधी दूर नसायाचीच की आवाज पोहंचनार
नाही पण आता तस नाही. कदाचित पत्र हे एकमेव साधन असू शकेल
तुझ्याशी संवाद साधायचे, म्हणून हा पत्रपंच...
उस्मानाबादच्या घरातल्या अनेक आठवणी आता आठवत
आहेत, अनेक घटना डोळ्यासमोरून जात आहे, अनेक शब्द कानात घुमत आहेत, जणू काही आताच घडून गेल्या सारख्या, भूतकाळात जायची कोणती मशीन असती तर वारंवार
त्या घटना, ते क्षण पुन्हा एकदा जगलो असतो. पण एक
आवाज कायमस्वरूपी कानात घुमत राहतो ते म्हणजे तू गायलेली अंगाई, "लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई"
हे गाणं आज सुद्धा तुझ्या आवाजात कानामध्ये घुमत आहे. एक वेगळी मोहिनी त्या
गाण्यात आणि "अमृता" ची गोडी तुझ्या आवाजात होती. तुझ्या आवाजात घोगरेपणा होता पण त्याला माधुर्य
होते, तूच बोलायचीस तुझ्या लहानपणी कोणी तरी
तुला शेंदूर खाऊ घातल्यामुळे तुझा आवाज खराब झाला. पण तरी सुद्धा त्या आवाजात
मधुरता आणि खंबीरता दोन्हीही असायच्या, उच्चारांची
स्पष्टता, वाक्यातले चढ-उत्तर कसलेल्या वक्त्या
प्रमाणे होते. रघुनाथाचे भजन गाताना तुला अनेकदा ऐकले आहे, आता प्रत्यक्ष रघुनाथाला तू भजन ऐकवत असशील यात
मला तिळभर शंका नाही.
तुझ्या लहानपणीच्या अनेक गोष्टी, गंमती-जमती तू आम्हला सांगितल्या आहेत. तुझ्या
माहेरी असलेले "कुलकर्णीपण", त्याचा
तुला खूप अभिमान होता. भूम तालुक्यातल्या चिंचपूर गावातले तुम्ही काळे-जोशी. घरात
जसे कुलकर्णी पण होते तसेच भिक्षुकी सुद्धा पिढीजात चालून आलेली होती.
"कमल" हे तुझा माहेरीच नाव, यशवंत-पार्वती
यांची तू मोठी मुलगी होतीस. तु वडिलांना दादा आणि चुलत्यांना अप्पा म्हणायचीस, देवडीकरांचा एकूण रागरंग पाहता कला आणि
त्यातल्या त्यात नाट्य व संगीत कालेची आवड तुझ्या माहेरकडून आली असावी असे वाटते.
तू सांगायचीस तुझ्या वडिलांची नाट्य कंपनी होती म्हणून तुला लहानपणी वेगवेगळे नाटक
बघण्याची संधी मिळायची. नाटकात अभिनय केलेला मात्र तू कधी सांगितलं नाहीस पण तुझे
साभिनय भारूडाचे सादरीकरण उत्तम असायचे. आत्ता आता वयाच्या ८५व्या वर्षा पर्यंत
तुझे साभिनय भारूड सादर केली होतीस. आमच्या प्रत्येकात कलेचा गुण तुझीच देणगी आहे
असे म्हणावे लागेल.
नाटक, संगीत
आणि त्याच बरोबर तुझी अजून एक आवड म्हणजे "आध्यात्म", स्वतःची वैचारिक बैठक निर्माण करून त्यावर
आधारित डोळस आध्यात्म तुझे होते. कोणत्याही ऐकीव गोष्टीवरती अंध विश्वास न ठेवता
आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक पातळीवर त्याचे मूल्यमापन तू करायचीस. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रंथराज दासबोध, श्रीमत भागवत हे फक्त परायणाचे ग्रंथ नसून
जीवनाचे मार्गदर्शक आहेत असे तू मानायची. उस्मानाबादच्या घरत तुझ्या आजोबांनी
दिलेला ग्रंथराज दासबोध वाचताना तू अजून सुद्धा डोळ्या समोर दिसतेस. आज काल
दिसणारी दांभिक आध्यात्माची कीड तुझ्या आध्यात्मिक आयुष्यात नव्हती. आजोबां सोबत
आध्यात्मिक विषयावर शास्त्रार्थ करताना अनेकदा अनुभवले आहे. अखंड नामस्मरण हे
तुझ्या आध्यत्मचे तत्व शेवट पर्यंत राहिले. जपाची माळ शेवट पर्यंत तुझ्या सोबत
दवाखान्यात होती आणि हाताची नामस्मरण मुद्रा होती.
तू सोवळे, शीवा-शीव
म्हणायचीस कारण जातीयतेच्या बडगा असलेल्या समाजात आणि काळात तुझा जन्म झाला म्हणून
असेल पण काळानुसार बदल स्वीकारणे तुला मान्य होते. त्यामुळेच असेल घरातील अंतजातीय
विवाहांना तू फक्त स्वीकारलं असे नाही तर त्यांना आपलस सुद्धा केलं. हे शक्य झालं
ते तुझ्या स्वतःच्या आध्यात्मिक बैठकी मुळेच. लोकसंचय
हा अजून एक तुझा गुणधर्म,
वेगवेळ्या जाती पंथाच्या लोकांसोबत
घेऊन कार्य करण्याची तुझी वृत्ती होती. आनंद नगर येथे श्रीकृष्ण मंदिर असावे हि
तुझीच संकल्पना कारण कोणत्याही जाती-पंथाचा व्यक्ती श्रीकृष्णाची पूजा बांधू शकतो
व त्याद्वारे सर्व जाती पंथाचे व्यक्ती त्या मंदिराशी जोडले जाऊ शकतात हा
त्यामागचा उद्देश.
हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह, वेगवेगळ्या मंदिरातील वेगवेगळे कार्यक्रम या मुळे तूम्ही दोघे ही
लोकांच्या संर्पकात होते,
समता नगर मधील दत्त मंदिर, समर्थ नगर मधील श्रीराम मंदिर, अनंतदास स्मारक मंदिर येथे तुमचे कार्य विशेष
होते. राष्ट्रभावनेने प्रेरित असलेल्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक प्रचारक, कार्यकर्ते
वार लावून आपल्या कडे जेवायला असायचे त्यांना स्वहस्ते जेवायला तू वाढायचीस.
तुझ्यात असलेल्या राष्ट्रीय विचारा मुळेच हे शक्य झाले. आता संघ काम करताना पुण्यात अनेक प्रचारक व राष्ट्रीय कार्यकर्ते ना
"देवडीकर आज्जी" अशी ओळख सांगणे पुरेशे असते ते त्यामुळेच. १८-१९ वर्षाखाली तुझ्या आणि आजोबांच्या हातून
भूमी पूजन झालेल्या कुंपनलिका अनेक दुष्काळ उस्मानाबादकरांची तहान भागवत आहे.
शिक्षणाचे महत्व तू ओळखले होते, लौकिक अर्थाने जरी पाचवी-सहावी पर्यंत तुझे शिक्षण असले तरी समज व ज्ञान कोणत्यातरी
पदवीधरा पेक्षा जास्त होते. एखादी गोष्ट 'मला
येत नाही' असे सांगण्या पेक्षा ती गोष्ट 'मला
शिकायला आवडेल' असा तुझा दृष्टिकोन असायचा. एखाद्या
गोष्टी बद्दल अभ्यास करणे,
त्याविषयी चर्चा करणे आणि त्याबद्दल
स्वतःचे एक मत तयार करणे असा तुझा दृष्टिकोन होता. मुलांचं शिक्षण हे सुद्धा
तेवढेच महत्वाचे मानून त्याकडे सुद्धा लक्ष दिले, त्यावेळच्या समाज व्यवस्थे मध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात तुझ्याच मुळे तिन्ही मुले
कार्यरत झाली व यशस्वी झाली. आयुष्यभर नवीन शिकण्याचा ध्यास तुला होताच अगदी
सांगायचे झाले तर वयाच्या ८३-८४ व्या वर्षी सुद्धा मोबाईल तू शिकला होता. नवीन
तंत्रज्ञानाची सुद्धा तुला आवड होती. धार्मिक
वृत्ती असून सुद्धा कधी अघोरी कर्मकांडाच्या आहारी तू गेली नाहीस तसेच विज्ञानाशी
कधी वावडे नाही.
उस्मानाबादच्या घराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे
त्या घरा भोवती तू उभा केलेली वृक्ष संपदा. आंबा, पेरू, बोर, जांभूळ, सीताफळ, पपई, रामफळ, डाळींब, शेवगा ही फळ झाडे. जाई-जुई, गुलाब, चमेली, सदाफुली, पारिजातक
हे फुल झाडे तर अशोक, निलगिरी, औदुंबर हे वृक्ष अजून सुद्धा तुझी साक्ष देत आहेत. दारात पडलेल्या पारिजातकांच्या फुलाचा सडा आणि रातराणीच्या
फुलांचा सुगंध अजूनही तिथल्या हवेत दरवळत आहे.” वृक्ष
वल्ली आम्हा सोयरे” या तुकोबांच्या ओळी प्रमाणे तू घरातले
नंदनवन फुलवले. माणसं इतकं झाडांना सुद्धा जपलं.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या काही वर्षातच तुझं
लग्न झाला होत, साल नेमकं माहित नाही १९४८-४९ असेल, सहजीवनाची ७१री साजरी करत आहेत तुम्ही, सर्वसामान्य माणसाची आयुर्माना एवढे तुमचे
सहजीवन आहे हे सुद्धा आजच्या काळातील "अपूर्वा"ई म्हणावी लागेल. पण आता ते खूप एकटे आहेत, तसे ते दाखवत नाहीत पण जीर्ण
व प्राचीन वृक्षा प्रमाणे शांत आणि गंभीर आहेत. तुझ्या नसण्याचा फरक त्यांच्यात
दिसत आहे पण ते समाधानी आहेत.
गदिमांच्या काव्य पंक्ती प्रमाणे,
"ज्ञनियाचा वा तुकियाचा
तो च माझा वंश आहे,
माझ्या रक्तात थोडा
ईश्र्वराचा (देवा-)अंश
आहे"
उत्कर्षा ची आनंदयात्री तू
आज "राघवा"च्या चरणाची दुर्वांकुर आहेस...!!!
वृंदावन
