Sunday, 7 May 2023

घर, बंदूक, बिर्याणी

 

नागराज मंजुळे आणि काही तरी वेगळं आस समीकरण आता दुर्लभ होत चालल्या बहुतेक, "घर, बंदूक, बिर्याणी" च्या निमित्याने हे जाणवते. पिस्तुल्या, फॅड्री, नाळ यात सामान्य पटकथा पण वेगळ्या मांडणी मुळे आकर्षित करतात तर सैराट, झुंड या चित्रपटा करतात अनेक आकर्षणाचे बिंदू वापरले आहेत त्यात सैराट हा प्रचंड लोकप्रिय झालेला चित्रपट तर अमिताभ बच्चन असून सुद्धा झुंड म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. "घर, बंदूक, बिर्याणी" हा नावा मध्ये वेगळेपण घेऊन आलेला चित्रपट असला तरी फार आकर्षित करत नाही. चित्रपटाच्या पटकथेचा वास्तवाशी फार संबंध नाही, या पूर्वीचे नागराज आण्णा यांच्या चित्रपटात वास्तवाला धरून असलेली पटकथा होती आणि तेच नागराज आण्णा च्या चित्रपटाचे यश होते. 



ह्या चित्रपटात तीन मुख्य पात्र भवती फिरत आहे, राय पाटील (नागराज आण्णा), पल्लम (सयाजी शिंदे) आणि राजू (आकाश ठोसर). तिघे ही कसलेले अभिनेते आहेत आणि हेच या चित्रपटाचे आकर्षण बिंदू आहेत. हि एक काल्पनिक कथा कोलागड परिसरातील आहे ज्यात पल्लमा नक्षलवादी, उग्रवादी लोकांच्या गटाचा मोरक्या असते, तर राजू त्याच परिसरात एका ढाब्यावरील आचारी असते. राजू कोलागड परिसरात त्याच्या नॉन व्हेज बनवण्यामुळे प्रसिद्ध असतो व  त्यामुळेच राजुचे या नक्षलवादी गटा करून अपहरण होते, राजुचे लक्ष्मी (सायली पाटील) वर प्रेम असते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे असते, तर लक्ष्मीचे वडील राजुला लग्नांना करिता स्वतःच्या "घराची" अट घालतात. अपहरण झाल्यावर राजुला कळते नक्षलवाद्यांशी फितुरी करून पोलिसांना शरण गेल्यावरती पोलीस "घर" देतात, तर राय पाटील हे पोलीस इन्स्पेकटर या कोलागड परिसरात पल्लमा टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलेले असतात. आता नेमके राजुला घर मिळते का नाही आणि राय पाटील, पल्लमा व राजू एकमेकांसमोर आल्यावर काय होते हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हला लक्षात येईल.

चित्रपटाचा पूर्वाध पात्रातील संवादा मुळे विनोदी आहे तर उत्तरार्धा  काहीसा गंभीर आहे. चित्रपटाचे पार्श्व संगीत आहि गाणे ठीक आहेत, काही गाणे उगाच वाढवल्या सारखे वाटतात. एकूण २ तास ४१ मिनिटांचा चित्रपट निव्वळ मनोरंजन म्हणून पाहण्यास हरकत नाही. मात्र नागराज अण्णांच्या या पूर्वीच्या चित्रपटांची अपेक्षा ठेऊन तुम्ही पाहण्यास जाणार असाल तर तुमचा भ्रमनिरास होईल. चित्रपट पाहायचा कि नाही हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे पण नागराज मंजुळे यांचे वेगळेपण या चित्रपटात दिसत नाही हे नक्की....

 

विराज

दि केरळ स्टोरी


इंग्रजी आणि उर्दू/फारसी मध्ये एक म्हण (phrase) आहे, ती म्हण दोन्ही म्हणजे इंग्रजी आणि उर्दू/फारसी संस्कृतीचा एक पैलू दाखवायला मदत करते. ती म्हण "Everything fair in love and war" आणि उर्दू/फारसी "इश्क और जंग में सब जायज है". पाश्चिमात्य संस्कृतीची प्रेम आणि युद्धा बद्दल ही मांडणी आपण मागील अनेक वर्षांपासून स्वीकारत आलो आहेत. मात्र भारतीय संस्कृती मध्ये प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ/न्याय्या आहे असे होत नाही. भारतीय संस्कृतीत प्रेमाचा एक "त्याग" आहे तर युद्धाचा एक "धर्म" असतो. येथे धर्म या शब्दाचा अर्थ प्रार्थना पद्धती नाही तर तत्व/नियम घ्यावा. युद्धाचा नियम असतो आणि प्रेमाचा त्याग असतो असे भारतीय संस्कृती म्हणते. हे सगळे सांगण्यामागे नुकत्याच येऊ घातलेल्या एक चित्रपटाची पार्शवभूमी आहे.



"दि केरळ स्टोरी" हा विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि सुदीप सेन दिग्दर्शित चित्रपट येत्या ५ तारखेला प्रदर्शित होत आहे. मागील आठवड्यात त्याचा ट्रीजर आला आणि तो मोठ्या प्रमाणात पहिला गेला सोबत viral सुद्धा झाला. मेन स्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडिया दोन्ही मध्ये या चित्रपटा बद्दल चर्चा मागील सहा-सात दिवसा पासून होत आहे. हा चित्रपट केरळ मधील मागील काही वर्षा पासून गायब झालेल्या  ३२००० तरुणी/महिलांची कथा सांगतो असे निर्माते आणि दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. हा चित्रपट सत्य घटनेवरती आधारित आहे असे सुद्धा निर्मात्याचे म्हणणे आहे. एका विशिष्ट पंथाच्या तरुणी/महिलांना प्रेम जाळ्यात अडकवून त्यांचे धर्म परिवर्तन केले जाते आणि ISIS या कट्टरतावादी संघटनेत सामील करून त्यांचा आतंकवादी कार्यात उपयोग केला जातो असे या चित्रपटाच्या ट्रीजर मध्ये दिसते. या एका कारणामुळेच या चित्रपटा बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे व त्याच मुळे उजव्या व डाव्या विचारसरणीत या बद्दल चर्चा होत आहे. या चित्रपटात दाखवणायत आलेल्या सर्व घटना व पात्र किती खरी व खोटी हे आताच चित्रपट न पाहता सांगणे कठीण आहे. मात्र या चित्रपटातील मांडणी १००% अयोग्य आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. चित्रपटाच्या चांगल्या वाईट बाबींवर चित्रपट पाहून भाष्य करणे योग्य होईल. डावी विचारसरणी आणि देशातील प्रमुख विरोधी पक्ष या चित्रपटाला प्रपोगंडा मुव्ही म्हणत आहे आणि या चित्रपटा द्वारे एखाद्या विशिष्ट समजला टार्गेट केले जात आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाला केरळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत काँग्रेस च्या प्रमुख नेत्याने विरोध केला आहे. माध्यमं मध्ये चित्रपटाच्या प्रदर्शना पूर्वीच चर्चा सुरु झाल्यामुळे चित्रपटाचे महत्व वाढले आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे, हा चित्रपट पाहून त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल.

 

धन्यवाद

 


Sunday, 5 February 2023

भूपाळी

 

सकाळी सकाळी लता दीदींनी रियाज सुरु केला आणि देवांना कळून चुकलं कि लता मंगेशकर स्वर्गात आल्या, " उठा उठा हो सकळीक" या दीदींच्या आवाजातील भूपाळी ने सगळ्या देवांची त्यादिवशी सकाळ झाली. स्वतः लता मंगेशकर स्वर्गात आल्या म्हटल्यावर प्रत्येक देवाला दीदींच्या स्वरातून गाणे ऐकण्याचा मोह झालाच होते, पण सुरवात कोणा पासून होणार हा प्रश्न होता. नारद मुनींनी "नारायण-नारायण" म्हणत श्री विष्णू च्या दरबारात हजेरी लावली, त्यावेळी भगवान शांत चित्ताने चिंतनात शेषनागावरती विराजित होते, माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती. नारद मुनींच्या आवाजाने भगवंताचे चिंतन भिंगले व ते हसत नारद मुनींना म्हणाले, "आज एवढ्या सकाळी-सकाळी विष्णू लोकात कसे काय येणे केले नारद मुनी तुम्ही?", नारदांनी भगवंतांना नमस्कार करत म्हणाले " भगवंता, आज सकाळच्या भूपाळीचा स्वर तुमच्या कानी आलाच असेल !" नारदांच्या या वाक्यावर भगवंतांनी स्मित हास्यकरत मान डोलावली आणि म्हणाले " हो, नारदा, तो भूपाळीचा स्वर्गीय स्वर माझ्या कानी आला आणि मला कळले लता स्वर्गात आली", त्यावरती माता लक्ष्मीने नारदांकडे पहात प्रति प्रश्न केला, "पण तुम्ही हे विचरण्याकरिता विष्णू लोकात आलात?" त्यावर नारद मुनी माता लक्ष्मी ला नमस्कार करत म्हणाले, "नाही माते, मला हे माहित आहे भगवंतांना चरा चराची माहिती आहे, पण लता दीदी स्वर्गात आल्या आहेत तर आम्हाला श्री विष्णूची स्तुती त्यांच्या स्वरात कधी ऐकायला मिळेल हे विचारायला आलो आहे?" नारदांच्या या प्रश्ना वरती माता लक्ष्मी ने भगवंता कडे पहिले तेव्हा भगवांताच्या चेहऱ्यावरती तेच निरागस स्मित होते आणि भगवंत डोळे मिटून चिंतनात रमले होते. भगवंताच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याचा अर्थ नारदांना समजला नाही, मात्र ते पाहून नारदांनी कैलासाची वाट धरली.

कैलासावर भगवान शिव ध्यानस्त मुद्रेत बसले होते, माता पर्वती शेजारी विराजमान होत्या, समोर नंदी हात जोडून उभे होते. नारद मुनी कैलासावर नारायण नारायण चा जप करत पोहंचले आणि भगवान शंकरच माता पार्वतीला म्हणाले, " आज नारद विशेष प्रयोजन घेऊन कैलासावर आले आहेत !", माता पार्वती म्हणल्या "कोणते प्रयोजन भगवंत?", मातेच्या या प्रश्नाचे उत्तर भगवान शंकर देणार तेवढ्यात नारद मुनी भगवान शंकराला आणि माता पार्वतीला नमस्कार करत  म्हणाले, " माते भगवंत तर सर्वज्ञानी आहेत, मला काही सांगण्याची आवश्यकता नाही पण तरीही विचारतो, पृथ्वीवरील स्वर्गीय स्वर लता दीदी स्वर्गात आल्या आहेत आणि मला त्या स्वरातून शिव तांडव  स्तोत्र ऐकायची आहे. आणि लता दीदींच्या आवाजातील शिव स्तुती कधी ऐकायला मिळेल ते विचारायला भगवान शंकरा कडे आलो आहे." नारद मुनींचे वाक्य ऐकल्यावर माता पार्वती प्रश्नार्थक मुद्रेने पहात होत्या आणि भगवान शंकर त्याच स्मित हास्याने ध्यानस्त झाले होत. 

इकडे इंद्राच्या दरबारात तर वेगळीच धावपळ सुरु होती. देवांचा राजा इंद्राने सर्व अप्सरांना पुढच्या वर्षभरा करीता सक्तीच्या सुट्टीवर पाठवले होते. इंद्र दरबारात पुढील काही दिवस लता दीदींच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्याचे ठरवले होते. काही देव तर आवडीचे गाणे निवडत होते. उत्तमोत्तम संगीत साथ देणाऱ्यांची सूची करण्यात येत होती. तर काही देव वाद्यांची निवड करत होते. हे सर्व होत असताना एक बैठक संतांनी सुद्धा बसवली संत ज्ञानेशवर महाराज, निवृत्ती महाराज, मुक्ता बाई , संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, संत चोखामेळा, संत जनाबाई, समर्थ रामदास या सर्वांची बैठक बसली. या बैठकीचे प्रयोजन सुद्धा लता दीदींचे गाणे हेच होते, कोणाला लता दीदींच्या आवाजात ऐकायचे होती ज्ञानेश्वरी आणि पसायदान तर कोणाला तुकाराम महाराजांचे अभंग, कोणाला एकनाथांचे भारूड तर कोणाला नामदेव महाराज आणि गोरोबा काकांच्या रचना प्रत्येक संताला लता दीदींच्या आवाजातून काही न काही ऐकायचे होते, भगवंताचे नामस्मरण दीदींच्या स्वरात प्रत्येक संत अनुभवू पाहत होते.

संतांची बैठक होत असतानाच भगव्या ध्वजा खाली राजमाता जिजाऊ साहेब आणि शंभू राजांसोबत छत्रपती शिवाजी महाराज बसले होते, सदरे वरती खाश्या स्वाऱ्या समोर मोरोपंत पिंगळे, रामचंद्र पंत आमात्य, सरसेनापती प्रतापराव गुजर-हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे आणि अनेक मराठा मावळे उभे होते. या दरबारात माँसाहेब शिवरायांना म्हणाल्या, " शिवबा आम्ही ऐकलं आहे लता स्वर्गात आली आहे म्हणे !" राजे उत्तरले, "होय माँसाहेब", शिवाजी महाराजांनी हसत उत्तर दिले. "राजे आमची एक इच्छा आहे" माँसाहेब जमलेल्या सर्व मावळ्यांकडे पहात म्हणाल्या, "लताच्या आवाजातील 'जय देव जय देव जय जय शिवराय' ही आरती ऐकायची आहे." छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेबांकडे व सर्व मावळ्यांकडे पाहत फक्त "जगदंब-जगदंब" म्हटले आणि  माँसाहेबांची ही इच्छा सर्व मावळ्यांनी उचलून धरत हर हर महादेवचा जयघोष केला. बर एवढे सगळं स्वर्गात होत असताना वासुदेव बळवंत फडके पासून टिळक आगरकरा पर्यंत सर्व भारतीय स्वात्रंत्र्याचे सैनिक आणि क्रांतिकारक हे दीनानाथ मंगेशकर यांच्या कडे लता दीदींना वंदे मातरम गाण्याचा आग्रह धरून बसले होते. या वेळे पर्यंत लता दीदी स्वर्गात येऊन दुपार उलटली होती आणि दुपारच्या जेवणा नंतर सगळी मराठी सारस्वत मंडळी कट्ट्यावरती एकत्र जमली होती पुलं-सुनीता बाई, कुसुमाग्रज, भीमसेन जोशी, वसंतराव, शांता बाई शेळके एक ना अनेक नावे असलेली मराठी लेखक, कवी कवयत्री स्वर्गातल्या कट्ट्यावर जमून लता दीदींच्या मैफलीची तयारी करत होती. हार्मोनियम वर कोण बसणार, तानपुरा कोण पकडणार, तबला कोण वाजवणार, सूत्र संचालन कोण करणार अशा अनेक गोष्टींचे नियोजन ही मंडळी करत होती.

लता मंगेशकर स्वर्गात काय आल्या स्वर्गात जणू वसंत पालवीचे फुटली होती. पृथ्वी वरील अनेक पिढ्या लता दीदींच्या आवाजाने, त्यांच्या स्वराने संमोहित झाल्या होत्या आणि आता स्वर्गातील अनेक पिढ्या मंत्रमुग्ध होणार होत्या. नारद मुनीनी स्वर्गातील हा उत्साह पहिला आणि त्यांना भगवान शंकराच्या व श्री विष्णूच्या स्मित हास्याचे रहस्य कळले.

 

विराज देवडीकर

Sunday, 13 November 2022

कांतरा

 

मागच्या आठवड्यात “कांतरा”  पाहिला, हिंदी मध्ये भाषांतरित झाल्यावर थेटर मध्ये जाऊन पाहिला. मागील वर्षा पासून दक्षिण भारतातील फिल्म कन्टेन्ट वरती विशेष लक्ष देऊन आहे. मग तो “असुरन असेल किंवा कर्नन, मंडेला असेल किंवा जय भीम” असेल. प्रत्येक कलाकृती स्वतःचे वेगळेपण टिकून आहे. कांतरा हा त्याच निर्मिती मधला भाग आहे. दाक्षिणात्य चित्रपट सुष्टी म्हटलं कि आपल्याला तेलगू किंवा तामिळ चित्रपट आठवतात पण या दोन भाषा व्यतिरिक्त कन्नड भाषेतील चित्रपट सुद्धा वेगळे अस्तित्व टिकवून आहेत आणि कांतरा त्यातीलच एक. ऋषभ शेट्टी या लेखक अभिनेता दिग्दर्शकाणे एक वेगळा प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून कन्नड चित्रपट सृष्टीत केला आणि रसिकांनी त्याला भर भरून प्रतिसाद दिला असे म्हणावे लागेल. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या दिवाळीत हिंदीत भाषांतरित झाला. सुरवातीच्या काही दिवसात या चित्रपटाने कमाईचा विक्रम रचला व सामान्य प्रेक्षकाला थेटर मध्ये आकर्षित केले. दाक्षिणात्य चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चांगल्या विरुद्ध वाईटाची लढाई किंवा प्रस्थापिता विरुद्ध सामन्याचे युद्ध, कथानकाचा हाच गाभा घेऊन लेखक दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी चित्रपटाची रचना केली आहे. १८०० शतकातील दंतकथेत एक राजा त्याची जंगलातील जमीन तेथील स्थानिक आदिवासींना देऊन टाकतो एका दैवी शक्तीला खुश करण्यासाठी व त्या बदल्यात तो राजा स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे अभय या दैवी शक्ती कडून मागतो. कथानक पुढे सरकते व पोहंचते १९९० च्या दशकात जेव्हा त्याच राज घराण्यातील एक वंशज (देवेंद्र) जंगलाची जमीन तेथील आदिवासी लोकांकडून बळकवण्याचा प्रयत्न सुरु करतो. या करीता  त्याला मदत करत असतो त्याच्या वर अंधळाविश्वास ठेवलेला त्याचा नौकर शिवा (ऋषभ शेट्टी). पण कथानकात येणाऱ्या एका ट्वीस्ट मुळे शिवा राजाच्या वंशजा विरुद्ध उभा राहतो  आणि आदिवासी लोकांना मूलभूत हक्क मिळवण्यासाठी लढतो. तो या लढ्यात यशस्वी होतो का नाही आणि त्याला कोणकोण साथ देते हे चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला लक्षात येते. हा भयपट असल्यामुळे हॉरर दृश्य आणि त्या प्रमाणे पार्श्व् संगीताची मांडणी व जंगलाचे चित्रीकरण या मुळे चित्रपट आणखीन आकर्षित होतो. 


या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान विष्णूचे वराह अवतारातील असलेले लोकनाट्य ज्याला कर्नाटकच्या किनारपट्टी भागात “भूत कोला” असे म्हटले जाते. हा एक नृत्य प्रकार आहे  यातील नृत्य नर्तक म्हणजे "कोला" हे भगवान वराह चे द्वारपाल म्हणून ओळखले जातात. ते दुष्ट आत्म्यान पासून वन आणि आदिवासींचे रक्षण करतात अशी मान्यता आहे. त्या दैवी शक्तीच्या वार्षिक उत्सवात हे भूत कोला होत असते आणि हे लोकनाट्य सादरकरणाऱ्या कलाकारांच्या अंगात त्या दैवी शक्तीचा संचार होत असतो. ती दैवी शक्ती त्या कलाकारांच्या माध्यमातून आदिवासी लोकांशी संवाद साधत असते अशी येथील लोकांची मान्यता आहे. भगवान बिसरा मुंडा यांच्या प्रमाणेच हा द्वारपाल वनवासी आणि आदिवासींना एकत्र करून त्यांचा हक्का करिता लढत असतात, वनवासी समाजच्या संघर्षाचे नेतृत्व हे "कोला" करतात. त्या संघर्षाचे चित्रण या चित्रपट केले आहे. या चित्रपटातून वनवासी आणि आदिवासी समाजाची हिंदू प्रथा परंपरेवर असलेली श्रद्धा दिसून येते. 



हा चित्रपट जरूर पहावा कथानकाची वेगळी मांडणी, सर्व कलाकारांचा अभिनय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "भूत कोला" व त्याचा नृत्य प्रकार प्रचंड आकर्षण निर्माण करतो. "वराह रुपम" या गाण्यासाठी सुद्धा चित्रपट पाहावा, गाण्यात वाजणाऱ्या गूढ पण श्रवणीय सनई ऐकावी अशी आहे.

                                         

विराज वि देवडीकर

Sunday, 14 November 2021

#वर्षाचा_दिवस_३१९_वा,

​#वर्षाचा_दिवस_३१९_वा,

 

आज दिवाळीची सुट्टी संपून गावा कडून निघालो, सोलापूर मार्गे पुणे रस्ता चांगला असल्यामुळे त्या मार्गे जायचे ठरवले. अनेकदा या मार्गे आलो आहे त्यामुळे विशेष अडचण नव्हती आणि निवांत वेळ होता म्हणून थोडी भटकंती करायची ठरवली. याच मार्गा वरती आमचे मूळ गाव असल्याचे अनेकांना कडून ऐकले होते, ते हुडकायचे व तेथे जायचे ठरवले. सोलापूर कडून पुण्याकडे जाताना कोठे तरी मोहळ तालुक्यात आमचे मूळचे गाव "देवडी" आहे असे माहीत होते. दुपारी सोलापूरला जेवण केले आणि गुगल मावशीला देवडी या गावचा पत्ता विचारला, गुगल मावशींनी तत्परता दाखवत लगेच गाव शोधून काढले. सादरण पुण्याकडे येताना मोहळ पासून १९ किमी अंतरावर एक छोटा उजव्या हाताला फाटा फुटतो. तेथून २किमी वर ५००० आसपास लोक वस्तीचे देवडी हे गाव आहे. आम्ही पोहनचला तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. 



गावात तसे परिचित कोणीच नव्हते. मला माहित असलेल्या पैकी आमच्या पूर्वजांनी त्या गावात बांधलेले एक दत्त मंदिर आहे असे कळले होते. त्याबद्दल काही माहिती मिळते का हे पहावे म्हणून गाडी खाली उतरलो आणि दुकानदारांना विचारले आणि मंदिराचा पत्ता मिळाला. मंदिरा पर्यंत गाडी जाते असे सुद्धा दुकानदराने सांगितले. छोटस गाव असल्यामुळे काही अंतर जाताच गाव ही संपलं आणि मंदिर सुद्धा सापडले नाही. पण गावची ग्रामपंचायत सापडली, ग्रामपंचायती जवळ कोणी न कोणी असेल किंवा मंदिर तरी असेल म्हणून ग्रामपंचायती जवळ गेलो, तर तेथे चावडीवर काही म्हातारे लोकं रम्मी चा डाव टाकून खेळत होते. ​चावडी वरच्या एका म्हाताऱ्याला, "राम-राम" घालून दत्त मंदिरा बद्दल विचारले तेव्हा, "पाव्हणं कोण तुम्ही" असा प्रति प्रश्न केला, मी माझे नाव, "देवडीकर" सांगितल्यावर त्यांनी "कोणचे देवडीकर", असे विचारले मला पहिल्यांदा तो प्रश्न जातीवाचक वाटलं पण लगेच त्या म्हाताऱ्या लोकांनी माझ्या चुलत दोन-तीन आजोबांची नावे घेतली. मी त्याचा नातू आहे असे सांगताच त्यातील एकाने दत्त मंदिरा चा पत्ता सांगितला, सोबत रस्ता सुद्धा दाखवायला निघाला. मी गाडी बोलावली आणि चालत त्या म्हताऱ्या आजोबा सोबत दत्त मंदिरा पर्यंत आले. फार अंतर नव्हते, छोटा स दत्त मंदिर एका चौथऱ्यावर बांधलेले होते, १००-१५० sq feet चा चौथरा आणि त्यावर ५०-६० sq feet चे मंदिर आहे. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर, त्यात दत्तात्रयांच्या पादुकांची स्थापना केली आहे. मंदिरात मूर्ती नाही, म्हताऱ्या आजोबांनी सांगितल्या प्रमाणे दर गुरुवारी मंदिरात पूजा होते, इतर दिवशी फक्त दिवा बत्ती केली जाते. मंदिराला एक लोखंडी दरवाजा आहे व मंदिराच्या उजव्या बाजूस औदुंबराचे झाले आहे. त्या म्हाताऱ्या आजोबानी सांगितल्या प्रमाणे त्या मंदिराची स्थापना माझ्या खापर पंजीने किंवा त्यापूर्वी देवडीकर या परिवारातील स्त्रीने केली होती, श्री क्षेत्र गाणगापूर येथून दत्तात्रयांच्या दगडी पादुका आणून येथे त्याची स्थापना केली होती अशी माहिती मिळाली, दत्त जयंतीला या मंदिरात छोटासा उत्सव सुद्धा साजरा केला जातो. 


याच मंदिराच्या समोर त्याकाळी आमची काही शेत जमीन होती आणि मंदिराच्या पाठीमागील बाजूस वाडा होता. वय वर्ष ८० च्या आसपास झुकलेल्या त्या म्हताऱ्या आजोबानी आम्हला सांगितली. १९ व्या शतकाच्या सुरवातीला कधीतरी आमचे पूर्वज या देवडी गावातून उस्मानाबाद जिल्यातील वाशी येथे स्थलांतरित झाले होते. त्यानंतर सुद्धा अनेक वर्ष माझ्या आजोबा पर्यंत या गावाशी आमची संबंध होते, पण मागील ३०-३५ वर्षात या गावाशी किंवा गावातील लोकांशी आमचा थेट संपर्क आला नव्हता. मंदिरामागील वाडा आता पूर्णपणे पडला आहे, काही भग्न अवशेष शिल्लक आहेत.



वापस गावात येताना अजून काही म्हाताऱ्या लोकांशी बोलणे झाले, त्यांच्या कडून सुद्धा याच प्रकारची माहिती मिळाली. पण आमच्या पूर्वजांनी या गावातून स्थलांतर का केले? या प्रश्नाचे उत्तर अजून शिल्लक आहे. त्याच बरोबर अजून बरीच माहिती या गावा बद्दल मिळवणे बाकी आहे. सध्या एवढेच

धन्यवाद​वापस गावात येताना अजून काही म्हाताऱ्या लोकांशी बोलणे झाले, त्यांच्या कडून सुद्धा याच प्रकारची माहिती मिळाली. पण आमच्या पूर्वजांनी या गावातून स्थलांतर का केले? या प्रश्नाचे उत्तर अजून शिल्लक आहे. त्याच बरोबर अजून बरीच माहिती या गावा बद्दल मिळवणे बाकी आहे. सध्या एवढेच

धन्यवाद​