२० मार्च २०२० ला शुक्रवार होता, नेहमी प्रमाणे मी सकाळी दहा-सव्वा दहा पर्यंत
ऑफिस ला निघालो होतो. रस्त्यावर एक अनाहूत शांतता पसरलेली जाणवत होती. त्या दिवशी
मी पुण्यातील अनेक महत्वाच्या रस्त्यावरून गेलो, सिंहगड रोड,
शास्त्री रास्ता, पौड रोड एरवी सकाळच्या वेळी किंवा दिवसभरात
कधीही हे रस्ते लोकांनी भरूनच वाहत असतात पण त्या दिवशी एक भीतीदायक शांतता त्या
रस्त्यांवर दिसत होती. जादूची कांडी फिरवल्या प्रमाणे लोक त्या रस्त्यावरूनच नाही
तर पूर्ण शहरातून गायब झाली होती. माझं ऑफिस च काम त्यादिवशी झालंच नाही पण
भरदिवसा निपचित पडलेलं पुणे मला पाहायला मिळाले.
९ मार्च २०२० रोजी फिरायला दुबई ला गेलेला एक
परिवार वापस पुण्यात आला व सोबत पुण्यात करोनची लागण झाली, त्यानंतरचे पुढील सहा महिने जगाच्याच इतिहासात
विलक्षण आणि अभूतपूर्व होते असे म्हणावे लागेल. या सहा महिन्यातील पहिल्या तीन
महिन्यात मार्च-एप्रिल-मे लोकं मध्ये एकमेकांबद्दल भीती आणि शंका होती. करोनाचा
जन्म व त्याचा प्रवास हे त्याकाळातील माध्यमे सविस्तर वर्णन करीत सांगत होती आणि
या मानवी मनातील शंका-कुशंकांना तेल ही घालत होती. त्यावेळेसच्या अनेक घटना आणि क्षण आठवताना आज सुद्धा अंगावर
काटा येत आहे.
या सगळ्या काळात पहिला महत्वाचा शब्द आला तो
म्हणजे "लॉकडाउन", तेव्हा
जगातील बहुतांश देशात लॉकडाउन ला सुरवात झाली होती किंवा लॉकडाउन झाले होत.
त्यामुळे अर्थातच भारतीय माध्यमांनी हा शब्द उचलायला सुरवात केली व सर्व
सामान्यांपर्यंत हा शब्द पोहंचला. लॉकडाउन त्यानंतर आलेला क्वारंटाईन, आसोलेशन, सोशल डिस्टेनसिग, कम्युनिटी स्प्रेड या शब्दांचा सर्वात जास्त वापर २०२० मध्ये झाला
असे म्हणावे लागेल. अनेक
करोना तज्ञ या काळात निर्माण झाले, अनेक
आरोग्य विषयक अभ्यासक झाले,
कोणी पाश्चिमात्य देशातून बोलत होते तर
कुणी खेड्यातल्या गाव गोष्टीतील करोना दाखवत होते. माध्यमांनी तर या काळात कळस
गाठला होता, त्यांचे चित्रण ह्युमन स्टोरी आणि
त्यातून मिळणारी प्रसिद्ध यात गुंतलेले होते. या काळात आकड्यांचा खेळ सुरु झाला होता, ते आकडे खरे खोटे करण्यासाठीची शासन व्यवस्थेची
धडपड, त्या आकड्यांना धरून होणारे
आरोप-प्रत्यारोप सर्व एकसुरात सुरु झाले होत. करोनाच्या अनेक रूपे, अनेक लक्षणे आणि त्यावर उपाय जसे माध्यमांनी
हुडकून काढले तसेच त्यामध्ये भर घालत सर्वसामान्यांनी त्या गोष्टींना मोठे केले.
आजारा पेक्षा उपाय जास्त मारक असे काहीसे वातावरण त्यावेळी होते. आज ते सर्व करोनची लक्षणे-उपाय आठवले कि हसू
येते व स्वतःचीच कीव येते.
२०२० मुळे देशाचं काय पण जगाचं राजकारण बदलले, समाजकारण बदलले, अर्थकारण बदलले. अचानक
निर्माण झालेली आरोग्याची आणीबाणी आणि त्यामुळे ठप्प झालेले सर्व व्यवहार यामुळे
अनेकांचे नोकरी-धंदे बंद पडले, अनेकांना
बेरोजगार व्हावे लागले. सामान्य माणसाच्या आर्थिक गतीला यामुळे खीळ बसली.
याच वर्षाने जगाला नवा दृष्टिकोन दिला स्वतः
कडे बघण्याचा पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे "भीतीचे मार्केटिंग" सुद्धा
कळले. वर्षभरानी करोना संपला नाहीच पण लोकांच्या मनातील भीती
नक्की कमी झाली आहे. भीतीची जागा आता लबाडीने घेतली आहे. करोनाचे व्यापारीकरण झाले
आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मागील काही
दिवसंपासून मी घेतला आहे. त्याबद्दल वाद असण्याचा किंवा खंत वाटण्याची फार गरज
नाही ती जग राहाटी आहे.
धन्यवाद विराज देवडीकर

