Sunday, 7 May 2023

घर, बंदूक, बिर्याणी

 

नागराज मंजुळे आणि काही तरी वेगळं आस समीकरण आता दुर्लभ होत चालल्या बहुतेक, "घर, बंदूक, बिर्याणी" च्या निमित्याने हे जाणवते. पिस्तुल्या, फॅड्री, नाळ यात सामान्य पटकथा पण वेगळ्या मांडणी मुळे आकर्षित करतात तर सैराट, झुंड या चित्रपटा करतात अनेक आकर्षणाचे बिंदू वापरले आहेत त्यात सैराट हा प्रचंड लोकप्रिय झालेला चित्रपट तर अमिताभ बच्चन असून सुद्धा झुंड म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. "घर, बंदूक, बिर्याणी" हा नावा मध्ये वेगळेपण घेऊन आलेला चित्रपट असला तरी फार आकर्षित करत नाही. चित्रपटाच्या पटकथेचा वास्तवाशी फार संबंध नाही, या पूर्वीचे नागराज आण्णा यांच्या चित्रपटात वास्तवाला धरून असलेली पटकथा होती आणि तेच नागराज आण्णा च्या चित्रपटाचे यश होते. 



ह्या चित्रपटात तीन मुख्य पात्र भवती फिरत आहे, राय पाटील (नागराज आण्णा), पल्लम (सयाजी शिंदे) आणि राजू (आकाश ठोसर). तिघे ही कसलेले अभिनेते आहेत आणि हेच या चित्रपटाचे आकर्षण बिंदू आहेत. हि एक काल्पनिक कथा कोलागड परिसरातील आहे ज्यात पल्लमा नक्षलवादी, उग्रवादी लोकांच्या गटाचा मोरक्या असते, तर राजू त्याच परिसरात एका ढाब्यावरील आचारी असते. राजू कोलागड परिसरात त्याच्या नॉन व्हेज बनवण्यामुळे प्रसिद्ध असतो व  त्यामुळेच राजुचे या नक्षलवादी गटा करून अपहरण होते, राजुचे लक्ष्मी (सायली पाटील) वर प्रेम असते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे असते, तर लक्ष्मीचे वडील राजुला लग्नांना करिता स्वतःच्या "घराची" अट घालतात. अपहरण झाल्यावर राजुला कळते नक्षलवाद्यांशी फितुरी करून पोलिसांना शरण गेल्यावरती पोलीस "घर" देतात, तर राय पाटील हे पोलीस इन्स्पेकटर या कोलागड परिसरात पल्लमा टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलेले असतात. आता नेमके राजुला घर मिळते का नाही आणि राय पाटील, पल्लमा व राजू एकमेकांसमोर आल्यावर काय होते हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हला लक्षात येईल.

चित्रपटाचा पूर्वाध पात्रातील संवादा मुळे विनोदी आहे तर उत्तरार्धा  काहीसा गंभीर आहे. चित्रपटाचे पार्श्व संगीत आहि गाणे ठीक आहेत, काही गाणे उगाच वाढवल्या सारखे वाटतात. एकूण २ तास ४१ मिनिटांचा चित्रपट निव्वळ मनोरंजन म्हणून पाहण्यास हरकत नाही. मात्र नागराज अण्णांच्या या पूर्वीच्या चित्रपटांची अपेक्षा ठेऊन तुम्ही पाहण्यास जाणार असाल तर तुमचा भ्रमनिरास होईल. चित्रपट पाहायचा कि नाही हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे पण नागराज मंजुळे यांचे वेगळेपण या चित्रपटात दिसत नाही हे नक्की....

 

विराज

दि केरळ स्टोरी


इंग्रजी आणि उर्दू/फारसी मध्ये एक म्हण (phrase) आहे, ती म्हण दोन्ही म्हणजे इंग्रजी आणि उर्दू/फारसी संस्कृतीचा एक पैलू दाखवायला मदत करते. ती म्हण "Everything fair in love and war" आणि उर्दू/फारसी "इश्क और जंग में सब जायज है". पाश्चिमात्य संस्कृतीची प्रेम आणि युद्धा बद्दल ही मांडणी आपण मागील अनेक वर्षांपासून स्वीकारत आलो आहेत. मात्र भारतीय संस्कृती मध्ये प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ/न्याय्या आहे असे होत नाही. भारतीय संस्कृतीत प्रेमाचा एक "त्याग" आहे तर युद्धाचा एक "धर्म" असतो. येथे धर्म या शब्दाचा अर्थ प्रार्थना पद्धती नाही तर तत्व/नियम घ्यावा. युद्धाचा नियम असतो आणि प्रेमाचा त्याग असतो असे भारतीय संस्कृती म्हणते. हे सगळे सांगण्यामागे नुकत्याच येऊ घातलेल्या एक चित्रपटाची पार्शवभूमी आहे.



"दि केरळ स्टोरी" हा विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि सुदीप सेन दिग्दर्शित चित्रपट येत्या ५ तारखेला प्रदर्शित होत आहे. मागील आठवड्यात त्याचा ट्रीजर आला आणि तो मोठ्या प्रमाणात पहिला गेला सोबत viral सुद्धा झाला. मेन स्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडिया दोन्ही मध्ये या चित्रपटा बद्दल चर्चा मागील सहा-सात दिवसा पासून होत आहे. हा चित्रपट केरळ मधील मागील काही वर्षा पासून गायब झालेल्या  ३२००० तरुणी/महिलांची कथा सांगतो असे निर्माते आणि दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. हा चित्रपट सत्य घटनेवरती आधारित आहे असे सुद्धा निर्मात्याचे म्हणणे आहे. एका विशिष्ट पंथाच्या तरुणी/महिलांना प्रेम जाळ्यात अडकवून त्यांचे धर्म परिवर्तन केले जाते आणि ISIS या कट्टरतावादी संघटनेत सामील करून त्यांचा आतंकवादी कार्यात उपयोग केला जातो असे या चित्रपटाच्या ट्रीजर मध्ये दिसते. या एका कारणामुळेच या चित्रपटा बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे व त्याच मुळे उजव्या व डाव्या विचारसरणीत या बद्दल चर्चा होत आहे. या चित्रपटात दाखवणायत आलेल्या सर्व घटना व पात्र किती खरी व खोटी हे आताच चित्रपट न पाहता सांगणे कठीण आहे. मात्र या चित्रपटातील मांडणी १००% अयोग्य आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. चित्रपटाच्या चांगल्या वाईट बाबींवर चित्रपट पाहून भाष्य करणे योग्य होईल. डावी विचारसरणी आणि देशातील प्रमुख विरोधी पक्ष या चित्रपटाला प्रपोगंडा मुव्ही म्हणत आहे आणि या चित्रपटा द्वारे एखाद्या विशिष्ट समजला टार्गेट केले जात आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाला केरळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत काँग्रेस च्या प्रमुख नेत्याने विरोध केला आहे. माध्यमं मध्ये चित्रपटाच्या प्रदर्शना पूर्वीच चर्चा सुरु झाल्यामुळे चित्रपटाचे महत्व वाढले आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे, हा चित्रपट पाहून त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल.

 

धन्यवाद

 


Sunday, 5 February 2023

भूपाळी

 

सकाळी सकाळी लता दीदींनी रियाज सुरु केला आणि देवांना कळून चुकलं कि लता मंगेशकर स्वर्गात आल्या, " उठा उठा हो सकळीक" या दीदींच्या आवाजातील भूपाळी ने सगळ्या देवांची त्यादिवशी सकाळ झाली. स्वतः लता मंगेशकर स्वर्गात आल्या म्हटल्यावर प्रत्येक देवाला दीदींच्या स्वरातून गाणे ऐकण्याचा मोह झालाच होते, पण सुरवात कोणा पासून होणार हा प्रश्न होता. नारद मुनींनी "नारायण-नारायण" म्हणत श्री विष्णू च्या दरबारात हजेरी लावली, त्यावेळी भगवान शांत चित्ताने चिंतनात शेषनागावरती विराजित होते, माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती. नारद मुनींच्या आवाजाने भगवंताचे चिंतन भिंगले व ते हसत नारद मुनींना म्हणाले, "आज एवढ्या सकाळी-सकाळी विष्णू लोकात कसे काय येणे केले नारद मुनी तुम्ही?", नारदांनी भगवंतांना नमस्कार करत म्हणाले " भगवंता, आज सकाळच्या भूपाळीचा स्वर तुमच्या कानी आलाच असेल !" नारदांच्या या वाक्यावर भगवंतांनी स्मित हास्यकरत मान डोलावली आणि म्हणाले " हो, नारदा, तो भूपाळीचा स्वर्गीय स्वर माझ्या कानी आला आणि मला कळले लता स्वर्गात आली", त्यावरती माता लक्ष्मीने नारदांकडे पहात प्रति प्रश्न केला, "पण तुम्ही हे विचरण्याकरिता विष्णू लोकात आलात?" त्यावर नारद मुनी माता लक्ष्मी ला नमस्कार करत म्हणाले, "नाही माते, मला हे माहित आहे भगवंतांना चरा चराची माहिती आहे, पण लता दीदी स्वर्गात आल्या आहेत तर आम्हाला श्री विष्णूची स्तुती त्यांच्या स्वरात कधी ऐकायला मिळेल हे विचारायला आलो आहे?" नारदांच्या या प्रश्ना वरती माता लक्ष्मी ने भगवंता कडे पहिले तेव्हा भगवांताच्या चेहऱ्यावरती तेच निरागस स्मित होते आणि भगवंत डोळे मिटून चिंतनात रमले होते. भगवंताच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याचा अर्थ नारदांना समजला नाही, मात्र ते पाहून नारदांनी कैलासाची वाट धरली.

कैलासावर भगवान शिव ध्यानस्त मुद्रेत बसले होते, माता पर्वती शेजारी विराजमान होत्या, समोर नंदी हात जोडून उभे होते. नारद मुनी कैलासावर नारायण नारायण चा जप करत पोहंचले आणि भगवान शंकरच माता पार्वतीला म्हणाले, " आज नारद विशेष प्रयोजन घेऊन कैलासावर आले आहेत !", माता पार्वती म्हणल्या "कोणते प्रयोजन भगवंत?", मातेच्या या प्रश्नाचे उत्तर भगवान शंकर देणार तेवढ्यात नारद मुनी भगवान शंकराला आणि माता पार्वतीला नमस्कार करत  म्हणाले, " माते भगवंत तर सर्वज्ञानी आहेत, मला काही सांगण्याची आवश्यकता नाही पण तरीही विचारतो, पृथ्वीवरील स्वर्गीय स्वर लता दीदी स्वर्गात आल्या आहेत आणि मला त्या स्वरातून शिव तांडव  स्तोत्र ऐकायची आहे. आणि लता दीदींच्या आवाजातील शिव स्तुती कधी ऐकायला मिळेल ते विचारायला भगवान शंकरा कडे आलो आहे." नारद मुनींचे वाक्य ऐकल्यावर माता पार्वती प्रश्नार्थक मुद्रेने पहात होत्या आणि भगवान शंकर त्याच स्मित हास्याने ध्यानस्त झाले होत. 

इकडे इंद्राच्या दरबारात तर वेगळीच धावपळ सुरु होती. देवांचा राजा इंद्राने सर्व अप्सरांना पुढच्या वर्षभरा करीता सक्तीच्या सुट्टीवर पाठवले होते. इंद्र दरबारात पुढील काही दिवस लता दीदींच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्याचे ठरवले होते. काही देव तर आवडीचे गाणे निवडत होते. उत्तमोत्तम संगीत साथ देणाऱ्यांची सूची करण्यात येत होती. तर काही देव वाद्यांची निवड करत होते. हे सर्व होत असताना एक बैठक संतांनी सुद्धा बसवली संत ज्ञानेशवर महाराज, निवृत्ती महाराज, मुक्ता बाई , संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, संत चोखामेळा, संत जनाबाई, समर्थ रामदास या सर्वांची बैठक बसली. या बैठकीचे प्रयोजन सुद्धा लता दीदींचे गाणे हेच होते, कोणाला लता दीदींच्या आवाजात ऐकायचे होती ज्ञानेश्वरी आणि पसायदान तर कोणाला तुकाराम महाराजांचे अभंग, कोणाला एकनाथांचे भारूड तर कोणाला नामदेव महाराज आणि गोरोबा काकांच्या रचना प्रत्येक संताला लता दीदींच्या आवाजातून काही न काही ऐकायचे होते, भगवंताचे नामस्मरण दीदींच्या स्वरात प्रत्येक संत अनुभवू पाहत होते.

संतांची बैठक होत असतानाच भगव्या ध्वजा खाली राजमाता जिजाऊ साहेब आणि शंभू राजांसोबत छत्रपती शिवाजी महाराज बसले होते, सदरे वरती खाश्या स्वाऱ्या समोर मोरोपंत पिंगळे, रामचंद्र पंत आमात्य, सरसेनापती प्रतापराव गुजर-हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे आणि अनेक मराठा मावळे उभे होते. या दरबारात माँसाहेब शिवरायांना म्हणाल्या, " शिवबा आम्ही ऐकलं आहे लता स्वर्गात आली आहे म्हणे !" राजे उत्तरले, "होय माँसाहेब", शिवाजी महाराजांनी हसत उत्तर दिले. "राजे आमची एक इच्छा आहे" माँसाहेब जमलेल्या सर्व मावळ्यांकडे पहात म्हणाल्या, "लताच्या आवाजातील 'जय देव जय देव जय जय शिवराय' ही आरती ऐकायची आहे." छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेबांकडे व सर्व मावळ्यांकडे पाहत फक्त "जगदंब-जगदंब" म्हटले आणि  माँसाहेबांची ही इच्छा सर्व मावळ्यांनी उचलून धरत हर हर महादेवचा जयघोष केला. बर एवढे सगळं स्वर्गात होत असताना वासुदेव बळवंत फडके पासून टिळक आगरकरा पर्यंत सर्व भारतीय स्वात्रंत्र्याचे सैनिक आणि क्रांतिकारक हे दीनानाथ मंगेशकर यांच्या कडे लता दीदींना वंदे मातरम गाण्याचा आग्रह धरून बसले होते. या वेळे पर्यंत लता दीदी स्वर्गात येऊन दुपार उलटली होती आणि दुपारच्या जेवणा नंतर सगळी मराठी सारस्वत मंडळी कट्ट्यावरती एकत्र जमली होती पुलं-सुनीता बाई, कुसुमाग्रज, भीमसेन जोशी, वसंतराव, शांता बाई शेळके एक ना अनेक नावे असलेली मराठी लेखक, कवी कवयत्री स्वर्गातल्या कट्ट्यावर जमून लता दीदींच्या मैफलीची तयारी करत होती. हार्मोनियम वर कोण बसणार, तानपुरा कोण पकडणार, तबला कोण वाजवणार, सूत्र संचालन कोण करणार अशा अनेक गोष्टींचे नियोजन ही मंडळी करत होती.

लता मंगेशकर स्वर्गात काय आल्या स्वर्गात जणू वसंत पालवीचे फुटली होती. पृथ्वी वरील अनेक पिढ्या लता दीदींच्या आवाजाने, त्यांच्या स्वराने संमोहित झाल्या होत्या आणि आता स्वर्गातील अनेक पिढ्या मंत्रमुग्ध होणार होत्या. नारद मुनीनी स्वर्गातील हा उत्साह पहिला आणि त्यांना भगवान शंकराच्या व श्री विष्णूच्या स्मित हास्याचे रहस्य कळले.

 

विराज देवडीकर