Wednesday, 18 October 2017

दिवाळी फराळ

आज पासून ४ दिवस दिवाळी सुट्टी वर जात आहे, तशी कमीच सुट्टी आहे या वर्षी, महिन्याच्या मध्ये किंवा शेवटी दिवाळी आली की कमीच सुट्ट्या मिळतात असो. या दिवाळीत सुद्धा माझा सोबत असणार आहेत ते दिवाळी अंक. खरे तर या दिवाळीत माझा प्लॅन काही वेगळाच आहे, चार दिवस चार गावे फिरावी लागणार आहेत, पहिला दिवस अर्थात औरंगाबाद, दुसरा उस्मानाबाद, तिसरा कळंब आणि चौथा तेर आणि वापस पुणे. सुट्टी तील प्रवास तस खूप बोर करणारा असतो त्यात स्वतः गाडी चालवत न्यायाची म्हणजे आणखीनच त्रास, इतर सर्व मज्जा करत असतात आणि आपण म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्या मोजत असतो नाहीतर राहिलेले किलोमीटर बघत असतो. कंटाळवाणे होते गाडी चालवणे आणि त्यात कोणी शिकवायला असले म्हणजे झाले. वैताग येतो, लॉंग ड्राईव्ह-नाईट ड्राईव्ह पुळचट कल्पना वाटतात. 
त्याच बरोबर या दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे, आम्ही घरचे सगळे उस्मानाबाद येथे दिवाळीला असणार आहेत, विशेष म्हणजे दिवाळीचे तीन दिवस आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातच राहणार आहोत. पाच वर्षांनी आम्ही उस्मानाबाद ला दिवाळी करणार आहोत. लहानपनी उस्मानाबादच्या दिवाळीची तशी औरच मज्जा असायची. एकतर फटाके उडवायला कसलीच अडचण नसायची, खूप मोठे पटांगण आणि तेवढे मोठ घरा समोरील अंगण असल्या मुळे खूप फटाके उडवता येत होते. दुसरे म्हणजे खाण्या पिण्याची चांगळ असायची, कॉलनीतील व शाळेतील जुने मित्र-मैत्रिणी भेटायच्या, नातलग आणि मित्रपरिवार भेटायचा. तसे माझ्या घरातले मिळूनच आम्ही सात आठ  भाऊ-बहिण एकत्र असायचो. खूप धमाल यायची, दिवाळीच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान झाल्यावर माझे वडील किंवा चुलते फटाक्यांची सर्व भावंडात समान वाटणी करायचे व तेवढेच फटाके दिवस भर आम्ही उडवायचो. फटक्यात अपटबार, लवंगी फटका, लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब हे दिवसा उडावण्या साठी तर रात्री साठी झाड, भुईचक्कर, रॉकेट असायचे. किल्ला फार कधी बांधला नाही पण मातीत किंवा वाळूच्या ढीगाभाऱ्यात सुतळी बॉम्ब लावून उडवायचो, मज्जा यायची.


पोटभर फराळ चोपून झाल्यावर घरात पत्ते खेळत बसने व्हायचे किंवा क्रिकेट खेळायचो माझा दोन्ही काका, माझे वडील आणी आम्ही सर्व भावंडं मिळून क्रिकेट खेळायचो. घरात मोठे अंगण असल्यामुळे एक टप्पा आऊट क्रिकेट खेळायला मज्जा यायची. दिवाळीच्या चार पाच दिवसात रोज नवीन पदार्थ खाणे व्हायचे. तसे माझ्या चुलत काकांचे घर सुद्धा उस्मानाबादला असल्यामुळे त्यांच्या कडे सुद्धा जाणे व्हायचे. पुस्तकं वाचन त्यावेळी कमीच होते, कारण अभ्यासाच्या पुस्तकामुळे इतर पुस्तके वाचण्यात रसच राहायचा नाही.
एकत्र कुटुंब पद्धतीतील दिवाळी साजरी करताना एक वेगळाच आनंद व्हायचा. अजून सुद्धा घरातले सर्व एकत्र दिवाळी साजरी करतोत. आता सर्व भावंडांची लग्न झाली आहेत आणि कधी औरंगाबादला तर कधी पुणे किंवा अकलूज ला दिवाळी होते पण उस्मानाबादची दिवाळी काही औरच असायची....

No comments:

Post a Comment